Ad will apear here
Next
वटवाघळांचे डॉक्टर - महेश गायकवाड
डॉ. महेश गायकवाड

डॉ. महेश गायकवाड हा चारचौघांसारखं, चौकटीतलं जीवन न जगणारा, एक झपाटलेला तरुण! साधारणपणे भीतीचा आणि अंधश्रद्धेचा विषय असलेल्या वटवाघळांवर या अवलियानं पीएचडी केलीय आणि निसर्गात राहून निसर्गाशी संवाद साधण्याची कलाही आत्मसात केलीय. ही कला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीही ते प्रयत्नरत आहेत. आता लोक त्यांना ‘वटवाघळांचे डॉक्टर’ म्हणून ओळखतात. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज डॉ. महेश गायकवाड यांच्याबद्दल...
..............
पडका वाडा किंवा ओसाड जागेवर असलेली निर्मनुष्य जागेतली एकाकी हवेली...मध्यरात्रीची वेळ आणि प्रवासात गाडी बंद पडल्यामुळे चुकलेला वाटसरू त्या वाड्याच्या किंवा त्या हवेलीच्या आश्रयाला आलेला...अशा वेळी मुसळधार पाऊस कोसळतोय, काळोखाचं साम्राज्य आणि त्यातच विजांचा कडकडाट, सोसाट्याचा सुटलेला वारा, त्यातच गंजलेल्या लोखंडी प्रवेशद्वाराचा विचित्र असा कर्रर्रऽऽ असा येणारा आवाज...झाडांच्या पानांची गूढ सळसळ आणि यातच भरीस भर म्हणून वटवाघळांचा चित्कार....या वातावरणाला आणखीच भयाण करणारा... एखाद्या भयपटातला असा प्रसंग आपण बघितलेला असतो. त्या वेळी घाबरलेलोही असतो; मात्र चित्रपट संपताच, दिवे लागताच ती काल्पनिक भीती क्षणात दूर पळून गेलेली असते. 

असाच आणखी एक प्रसंग मला आठवतो - मी आदिवासी भागात काम करत असताना एका विशिष्ट ऋतूत सायंकाळच्या वेळेत आकाशात काळ्या रंगाचे अनेक पतंग मला दिसत. मी आश्चर्य वाटून चौकशी केल्यावर कळलं, की त्या परिसरात वटवाघळांचं प्रमाण जास्त असून त्यांना पकडण्यासाठी आखलेली ही व्यूहरचना आहे. या वटवाघळांना मारून त्यांच्यापासून तेल तयार करायचं आणि ते सांधेदुखीसाठी वापरायचं (म्हणजे विकायचं) असा आदिवासींचा त्यामागचा हेतू असे. वटवाघळांपासून तयार होणारं हे तेल फारच गुणकारी असल्याचाही त्यांचा (अंध) विश्वाास होता. 

या दोन गोष्टींनंतर बराच काळ माझा वटवाघूळ या प्रकरणाशी काही संबंध आला नाही; पण डॉ. महेश गायकवाड नावाच्या चारचौघांसारखं चौकटीतलं जीवन न जगणाऱ्या एका व्यक्तीशी ओळख झाली आणि हीच कुतुहलाची वटवाघळं पुन्हा एकदा नव्यानं माझ्या मानगुटीवर येऊन बसली. डॉ. महेश गायकवाड हा एक झपाटलेला तरुण! एवढीच या माणसाची ओळख नाही, तर ‘वटवाघळांचे डॉक्टर’ म्हणून हा माणूस आज लोकांमध्ये प्रसिद्ध आहे. मग बोलताना मी या वटवाघळांपासून केलेल्या तेलाचा उल्लेख महेश गायकवाड यांच्याजवळ करताच, ते जोरात हसले. म्हणाले, ‘अहो, तेलासारखं तेल ते! त्यात कुठलेही औषधी गुणधर्म नाहीत. तेल उकळवताना हे आदिवासी लोक त्यात मेलेलं वटवाघूळ टाकतात आणि गंमत म्हणजे हे तेल शहरी लोकांना हवं असतं. चार पैसे मिळतात म्हणून ही आदिवासी मंडळी या वटवाघळांना मारून तेलात टाकतात.’ 

निसर्गसंवर्धन, पर्यावरणाचं रक्षण, वटवाघळांवर संशोधन अशी अनेक कामं एकाच वेळी करणाऱ्या डॉ. महेश गायकवाड यांचा प्रवास नेमका कसा कसा होत गेलाय, हे बघण्यासाठी आपल्याला फलटण इथं जावं लागेल. फलटणमधल्या निंबळक या छोट्याशा गावातल्या एका शेतकरी कुटुंबात महेशचा जन्म झाला. पुढे महेशनं विज्ञान विषय घेऊन शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्रात बीएस्सी ही पदवी मिळवली; मात्र शिक्षण घेता घेताच महेशला निसर्गाची ओढ वाटू लागली. खरं तर कोणाचंही मार्गदर्शन नाही, अभ्यासक्रमातला विषय नाही. असं असताना निसर्गसंवर्धनाचा विषय रात्रंदिवस महेशच्या डोक्यात येऊन तो अस्वस्थ होऊ लागला. आपल्या आजूबाजूला आपल्याला पोषक वातावरण नाही हे तो जाणत होता; पण काय नाही यापेक्षा काय आहे याचा त्यानं विचार केला. तेव्हा आपल्याकडे असलेली बुद्धी, निरीक्षणदृष्टी आणि वाट्टेल तितके परिश्रम करण्याची वृत्ती या जोरावर आपण आपल्याला आवडणारं काम करू शकतो याची जाणीव महेशला झाली. 

महेशनं बीएस्सी झाल्यानंतर पुण्यात येऊन एन्व्हायर्मेंटल सायन्स या विषयात एमएस्सी करायचं ठरवलं. त्यानं यात प्रथम श्रेणी मिळवली. या काळात त्याचा पर्यावरण विषयाचा गाढा अभ्यास झाला. फक्त पुस्तकी अभ्यासच नव्हे, तर महेशनं निसर्गात भटकंती करून डोंगर, दऱ्या, जंगलं, देवराया पिंजून काढल्या. निसर्गातल्या सगळ्या घटकांमध्ये परस्परपूरक संबंध कसा असतो, हे त्यानं जाणून घेतलं. निसर्गचक्रात सजीव आणि निर्जीव दोन्हीही घटक कसे महत्वाअसचे असतात, याचाही त्याचा अभ्यास होऊ लागला. 

एमएस्सी तर झाली. आता महेशनं डॉक्टरेट मिळवण्याचं ठरवलं; पण पीएचडी करायची तर नेहमीच्या विषयांत नाही, तर थोडा ‘हटके’ विषय घ्यायचा असं महेशनं ठरवलं. खरं तर त्यानं वाघावर संशोधन करायचं ठरवलं; पण अनेकांनी वाघावर आधीच इतका अभ्यास केलेला महेशला आढळला, की आपण त्यात आणखी काय नवीन भर टाकणार असं त्याला वाटलं. आणि अचानक महेशला ‘वटवाघूळ’ या विषयानं आकर्षित केलं. त्यानं हा विषय निवडताच घरात एकच हल्लकल्लोळ उडाला. ‘अरे, ही कसली दुर्बुद्धी तुला सुचलीये? पापी माणसं वटवाघळाच्या जन्माला जातात, तू वटवाघळांबरोबर राहिलास, त्यांना त्रास दिलास, तर तूही वटवाघळासारखा उलटा टांगला जाशील, तुझ्याशी लग्न कोण करील?’ महेशनं या सगळ्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केलं. कारण त्याचा निश्चय पक्का झाला होता. त्याचं पुणे विद्यापीठात वटवाघळावरचं संशोधन सुरू झालं. या संशोधनात त्याच्या प्रोफेसर डॉ. विशाखा कोरड यांनी त्याला मार्गदर्शन केलं. महेशनं पीएचडी मिळवली. साधारणपणे पीएचडी मिळाली, तरी त्या विषयाचा आपल्या आयुष्याशी पुढे संबंध राहतोच असं नाही; पण महेशला मात्र आपलं अख्खं आयुष्य वटवाघळांनी व्यापलं जाणार आहे याची पूर्णपणे कल्पना आली होती. 

महेशचा पीएचडी करतानाचा प्रवास तितकासा सोपा नव्हता. आणखी खोलात जाऊन त्याचा वटवाघळांचा अभ्यास सुरू झाला. आता ही वटवाघळं मोठ्या संख्येनं कुठे आढळतात, त्यांचं निरीक्षण कोणत्या वेळी आणि कसं करायचं हे सगळे प्रश्न महेशसमोर आ वासून उभे होते; पण चालणाऱ्याला वाट सापडते म्हणतात, तसं महेशनं सात वर्षं चक्क जंगलातच वास्तव्य केलं. जंगलात भटकंती आणि गुहेमध्ये निवास असा त्याचा प्रवास सुरू झाला. या सात वर्षांत त्याला चकित करणाऱ्या अनेक गोष्टींची माहिती मिळाली. त्या सगळ्या निरीक्षणांच्या त्यानं वेळोवेळी नोंदी ठेवल्या. जगभरात वटवाघळांच्या १०१३ जाती आहेत, तर भारतात १२३ प्रकारची वटवाघळं आढळतात. वटवाघळांचे एकूण तीन प्रकार असतात. यातली ८० टक्के वटवाघळं कीटक खाऊन उपजीविका करतात. काही वटवाघळं उंदीर आणि बेडूक खातात, तर काही वटवाघळं पूर्णपणे शाकाहारी असतात. कुत्रा, मांजर, पोपट याप्रमाणे वटवाघूळ हा पाळीव प्राणी असू शकतो का? तर दक्षिणेतल्या रामकृष्णन यांनी चक्क वटवाघळं पाळली आहेत. युरोपमध्येदेखील अनेक लोक वटवाघळं पाळतात. कारण ही वटवाघळं रात्री घरातले कीटक आणि डास यांचा फडशा पाडतात. 

उत्क्रांतीमध्ये माणूस जसा तग धरून राहिला आणि पुढे पुढे जात राहिला. त्यानं सर्वांत आधी गुहेमध्ये वास्तव्य करायला सुरुवात केली. वटवाघळांनीदेखील माणसाप्रमाणेच गुहेचा आसरा घेतला. फरक इतकाच, की वटवाघळांना एकांत आवडतो. त्यामुळेच ते पडकं देऊळ असेल, लेणी असतील किंवा निमर्नुष्य जागा असतील तिथल्या कपारीत वस्ती करतात. काही वटवाघळांचं आयुष्य सात ते १२ वर्षं, तर काहींचं १५ ते २० वर्षं असतं. 

वटवाघळं उंबरं म्हणजे त्यातले कीटक खातात आणि त्यांच्या विष्ठेतून उंबराचं बी जमिनीत रुजलं जातं. ही वटवाघळं निसर्गातल्या अन्नसाखळीचा समतोल राखतात. विलक्षण गोष्ट अशी, की आपल्या वजनाइतके कीटक वटवाघळं खातात. उत्क्रांतीमध्ये त्यांचे पाय नष्ट झाले असल्यामुळे ती उभी राहू शकत नाहीत आणि आपल्याला ती उलटी लटकलेली दिसतात. ती कधीही माणसावर हल्ला करत नाहीत. माणसाच्या चाहुलीनं ती फार तर त्याच्या आजूबाजूनं फिरतील; पण आक्रमण करत नाहीत. 

या काळात महेशनं पश्चिणम घाटातल्या दोन हजारांहून अधिक गुहांचाही अभ्यास केला आणि यादरम्यान पाच हजार वटवाघळं पकडून त्यांचा अभ्यास केला. वटवाघळांवरचं संशोधन करताना महेशला आतापर्यंत वटवाघळाच्या ३१ जाती ठाऊक झाल्या होत्या; पण त्याला आणखी तीन प्रजातींचा शोध लागला आणि आता वटवाघळांच्या ३४ जातींवर शिक्कामोर्तब झालं. या अभ्यासासाठी त्यानं पश्चिम घाटातलं कोयना ते कळसूबाई हे अंतर चालून तो भाग पिंजून काढला. स्थानिक आदिवासींच्या मदतीशिवाय आपल्याला अनेक गुहा सापडणार नाहीत, म्हणजेच पर्यायानं वटवाघळांची भेट होणार नाही, ही गोष्ट लक्षात आल्यानं महेशनं आदिवासींशी संवाद साधला. त्यांचं जगणं समजून घेतलं. त्यांच्याबरोबरच राहायला सुरुवात केली. आदिवासींच्या जीवनाशी महेश इतका समरस झाला, की हा आपल्यातलाच एक आहे असं ते मानू लागले. एके दिवशी आदिवासींनी वटवाघळं मारून आणली आणि त्यांचं मांस शिजवलं. महेशनं त्यांच्याबरोबर तेही खाल्लं. ते मांस आंबूस चवीचं लागत होतं. 

महेशला ही आदिवासी मंडळी गुहा शोधून देण्यात आणि वटवाघळं दाखवण्यात मदत करत, तर महेशनं आदिवासींच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी साह्य करायला सुरुवात केली. तिथले दलाल त्यांच्या उत्पादनाला कमी किंमत देऊन त्यांना फसवत. महेशनं या आदिवासींना थेट बाजारपेठेशी जोडून दिलं. कुठल्याही मध्यस्थांशिवाय बाजारपेठ मिळाल्यामुळे आदिवासींच्या हातात थोडाफार पैसा खुळखुळू लागला आणि ते महेशवर खूश झाले. इतक्यावरच महेश थांबला नाही, तर त्यानं आदिवासींचं पारंपरिक नृत्य आणि गाणं, त्यांचं संगीत ऐकलं/बघितलं होतं. त्यानं स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत या आदिवासींचं पारंपरिक नृत्य सादर करून त्यांना एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. महेशनं आदिवासींना शौचालयाचं महत्त्व पटवून देणं, त्यांच्यात आरोग्यविषयक जागृती आणणं, त्यांना दैनंदिन जगण्यासाठी भांडी, कपडे, घर या गोष्टी मिळवून देण्यासाठी मदत करणं अशा गोष्टी करायला सुरुवात केली. मुळातच आदिवासी निसर्गात राहत असल्यामुळे त्यांना जंगलाची आणि वनस्पतींची खास माहिती असते; पण महेशनं त्यांच्यात शास्त्रीय पद्धतीनं पर्यावरण जागृती आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यातल्या अनेक अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला.

हे सगळं करत असताना महेशचं वटवाघळांवरचं संशोधन अव्याहतपणे चालूच होतं. वटवाघळांच्या अभ्यासाबरोबरच त्या त्या ठिकाणच्या जैवविविधतेचाही अभ्यास आपोआपच होऊ लागला. शहरीकरणामुळे, जंगलं नष्ट होत चालल्यामुळे जैवविविधतेवर होणारे दुष्परिणाम त्याला ठळकपणे दिसू लागले. या सगळ्या सागरमंथनातून महेशनं अखेर आपला शोधनिबंध सादर केला. एका छोट्याशा गावातल्या खडतर वाटेनं चालणाऱ्या महेश या तरुणाला लोक आता ‘डॉ. महेश गायकवाड’ म्हणून ओळखू लागले. त्यांचं संशोधन नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भसूचीसारखं उपयोगी ठरेल, असा विश्वास पुणे विद्यापीठातल्या प्रोफेसरांनी व्यक्त केला आणि डॉ. महेश गायकवाडांच्या अनमोल कार्याचं मनापासून कौतुक केलं. 

आता हातात डॉक्टरेट आली होती; पण आपण डॉक्टर झालो आहोत या आनंदापेक्षा डॉ. महेश गायकवाड अस्वस्थ झाले होते. पर्यावरणाबाबत निष्काळजी असलेला समाज त्यांना दिसत होता. निसर्गसंवर्धनाविषयीचं लोकांचं असलेलं अज्ञान त्यांना बेचैन करत होतं आणि त्याच वेळी त्यांच्या मनाचा निर्धार पक्का झाला. त्यांनी ‘निसर्ग जागर प्रतिष्ठान’ नावाची संस्था स्थापन केली आणि आपलं यापुढचं आयुष्य निसर्गसंवर्धनासाठीच वेचायचं ठरवलं. आपल्या संस्थेतर्फे काय काय उपक्रम राबवले पाहिजेत याचा आराखडा त्यांनी तयार केला. त्याप्रमाणे मागच्या १० वर्षांत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळे उपक्रम आणि प्रकल्प यशस्वीपणे राबवले. 

खेडेगावात विद्यार्थ्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये निसर्गाबद्दल जागृती आणि संवर्धन व्हावं, यासाठी डॉ. महेश गायकवाड यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाअंतर्गत अनेक शिबिरं, व्याख्यानं, कार्यशाळा घेतल्या. पश्चिम घाटातल्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र पर्यावरण आणि वन विभागानं ‘निसर्ग जागर प्रतिष्ठान’ संस्थेवर जबाबदारी सोपवली. या प्रकल्पांतर्गत डॉ. महेश गायकवाड यांनी महाराष्ट्रातल्या १५ हजार शाळांमधून पर्यावरण शिक्षण प्रकल्प तयार करून राबवला. या प्रकल्पाचं यश हेच, की कोवळ्या वयातल्या मुलांना निसर्गाविषयी ओढ निर्माण झाली. फटाके का वाजवू नयेत हे मुलांना कळलं. या निसर्गात सगळेच जीव किती महत्त्वाचे असतात, हेही त्यांना समजलं. डॉ. महेश गायकवाड यांनी लोकांना स्थानिक झाडांचं महत्त्व समजावून सांगितलं. आपण आपल्या हौशीसाठी परदेशी वृक्ष लावतो आणि त्याचे इथल्या जैवविविधतेवर कसे दुष्परिणाम होतात हे त्यांनी उदाहरणं देऊन समजावून सांगितलं. शेवगा, मोह, उंबर, साधी बाभूळ ही झाडं निसर्गाला कशी जिवंत ठेवतात, हे त्यांनी अभ्यासलं. 

जातील तिथल्या लोकांना, विशेषतः शालेय मुलांना आणि तरुणांना एकत्र करून डॉ. महेश गायकवाड पर्यावरणाविषयी त्यांना सजग करण्याचं काम अविरतपणे करत आहेत. लोकांमध्ये असलेल्या वटवाघळांविषयीच्या अंधश्रद्धा आणि अज्ञान नष्ट करून त्यांना शास्त्रीय माहिती देण्याचं कामही ते करत असतात. शेतीसाठी आणि जंगलं अबाधित राहण्यासाठी वटवाघळांचं असणं किती गरजेचं आहे, ही गोष्ट ते तळमळीनं लोकांना सांगतात. 

बारामतीच्या ‘एन्व्हायर्न्मेंटल फोरम’ या संस्थेचे प्रमुख पर्यावरण अधिकारी म्हणून काम करताना डॉ. महेश गायकवाड यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ओढ्यांचं खोलीकरण करणं, बंधारे बांधणं, पाणथळ जागा आणि पाणवठे यांचं पुनरुज्जीवन करणं, वन्य प्राण्यांकरता कृत्रिम जलसाठे तयार करणं, उन्हाळ्यात या साठ्यांमध्ये पाणी आहे की नाही हे पाहणं, पाणी नसेल तर टँकरनं पाणीपुरवठा करणं या गोष्टी केल्या. यामुळे बारामती परिसरात वन्यजीवांची आणि पक्ष्यांची संख्या वाढली. या सगळ्या वाटेवर चालत असताना त्यांचा पक्ष्यांचाही अभ्यास झाल्यानं त्यांनी ‘भीमथडीचे पक्षिवैभव’ नावाचं पक्ष्यांबद्दलचं संपूर्ण माहिती देणारं सचित्र पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकामध्ये निसर्गाचं संवर्धन करणारे पक्षी, प्राणी, तिमिरदूत, वटवाघूळ, शेतकऱ्यांचे मित्र असलेले पक्षी यांची उपयुक्त माहिती दिली आहे. 

डॉ. महेश गायकवाडांचा उत्साह हा त्यांच्या सतत सुरू असणाऱ्या कामामुळेच बघायला मिळतो. निसर्गाची ओळख व्हावी, यासाठी ते निसर्गसहली, ट्रेक्स, निसर्गभ्रमंती यांचं आयोजन करतात. हिमालय असो वा केरळ, राजस्थान असो वा लेह-लडाख या सर्व ठिकाणी तेही बरोबर असतात. निसर्गातच तंबू ठोकून राहायचं, निरीक्षण करायचं आणि यामधूनच सोबत असलेल्या तरुणांमध्ये निसर्गाविषयीची तळमळ निर्माण करायची हा त्यांचा हेतू या सहलींद्वारे सफल होतो. सहलीच्या आधी असलेला तरुण आणि सहल झाल्यानंतरचा तरुण यांच्यातला फरक लगेचच जाणवतो. त्यांच्याबरोबर सहलीला जाणं म्हणजे विलक्षण अनुभव असतो. स्वतः डॉ. महेश गायकवाड कोसळणाऱ्या धबधब्याखाली उभे राहून पाण्यात चिंब भिजतात, तर कधी तंबूबाहेरच्या मोकळ्या मैदानात शेकोटी पेटवून काळोख्या रात्रीतलं चांदणं टिपतात. निसर्गात रमणाऱ्या या माणसाला भौतिक सुख-सोयी मोह पाडू शकत नाहीत.

निसर्गसंवर्धनाबरोबरच डॉ. महेश गायकवाड यांचा सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग असतो. त्यांनी मायनी गावातल्या काही गावकऱ्यांना दत्तक घेऊन त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी मदत केली. दुष्काळी गावातल्या पाझर तलावांची दुरुस्ती करणं, त्यातला गाळ काढणं, त्यासाठी निधी उपलब्ध करणं अशी अनेक कामं त्यांनी हातात घेऊन गावकऱ्यांच्या सहभागानं पूर्ण केली. मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यात, जिथं शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या, तिथं जाऊन डॉक्टरांनी अशा कुटुंबांच्या मदतीसाठी निधी उभारण्याचं काम हाती घेतलं. समाजातल्या दानशूर लोकांना आवाहन करून गरजू शेतकऱ्यांचं पुनर्वसन केलं. शेतकऱ्यांच्या कर्जचुकतीसाठी रोख रक्कम उभारणं, त्यांना बी-बियाणं उपलब्ध करून देणं, शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत करणं अशा अनेक स्तरांवर डॉ. महेश गायकवाड हे आजही कार्यरत आहेत. 

अभिनेते सयाजी शिंदेही डॉ. गायकवाड यांच्या कामात सहभागी झाले आहेत.इतकं सगळं काम करणारा हा तरुण केवळ ३६ वर्षांचा आहे. ‘निसर्ग जागर प्रतिष्ठान’ या संस्थेत त्यांच्या बरोबरीनं ३० माणसं कार्यरत असून, अभिनेते सयाजी शिंदे, बारामतीजवळच्या गावात राहून शेती करणारं डॉ. चंद्रशेखर धुमाळ आणि डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ हे डॉक्टर जोडपं त्यांच्याबरोबरीनं कामात उतरलं आहे. आजच्या या चंगळवादी वातावरणात असा उच्च ध्येयानं भारलेला आणि आपलं वैयक्तिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य वेगळं न ठेवणारा हा निसर्गसंवर्धक डॉक्टर आपल्या ओळखीचा झालाय. त्याच्या बरोबरीनं चालू या किंवा त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करू या.

आज वाढतं शहरीकरण, वाढता चंगळवाद आणि पर्यावरणाचा वाढता ऱ्हास यामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. ‘अख्खी पृथ्वी फक्त मानवासाठी, माणूस सोडून बाकी जीवसृष्टीशी आम्हाला काही देणंघेणं नाही,’ अशी आमची मानसिकता होत चालली आहे. अशा मानसिकतेमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत. तसंच शासनदरबारी डॉ. महेश गायकवाडांसारख्या तज्ज्ञ व्यक्ती नाहीत. त्यामुळे वृक्षलागवड करतानादेखील कुठल्याही वाट्टेल त्या वृक्षांची लागवड केली जाते. आज श्रीमंतांमध्ये किंवा हॉटेलिंग, रिसॉर्ट क्षेत्रात लँडस्केपचं फॅड वाढलंय. त्या वेळी तिथं वाट्टेल ती परदेशी झाडं लावली जातात. ती पर्यावरणाला पूरक आहेत का, हेही बघितलं जात नाही. उंबरासारखी झाडं लावल्यानं जमिनीतल्या पाण्याच्या साठ्यात प्रचंड प्रमाणात वाढ होते. कारण उंबराची मुळं हे काम करत असतात. स्थानिक झाडं लावल्यानं त्या त्या भागातले पक्षी त्या त्या झाडांवर वास्तव्य करतात. गुलमोहरासारखी परदेशी झाडं पक्ष्यांनाही आकर्षित करू शकत नाहीत. निसर्गसंवर्धन हे डॉ. महेश गायकवाडांसारख्या एकट्या माणसाचं काम नाही. सरकारला आपली उदासीनता झटकावी लागेल. एक नाही, दोन नाही, असे हजारो-लाखो डॉ. महेश गायकवाड व्यवस्थेमध्ये कार्यरत करावे लागतील...जनजागृती तर शालेय वयापासूनच करावी लागेल; पण महत्वाीनचं म्हणजे आपल्या पर्यावरणाच्या धोरणामध्ये बदल घडवावे लागतील. तेव्हा कुठे आपण आपल्या पुढल्या पिढीसाठी प्रदूषणमुक्त, जैवविविधतेनं नटलेला निसर्ग देऊ शकू. 

आपल्या शेतात, फार्म हाउसवर देशी झाडं लावायचीत? चिमण्यांची, पक्ष्यांची कुजबूज पुन्हा ऐकायचीय? निसर्गाचं संतुलन राखायचंय? नैसर्गिक अधिवास वाचवायचाय? आपली पुढली पिढी निसर्गाविषयी प्रेम बाळगणारी आणि सजग करायचीय?... मग डॉ. महेश गायकवाड यांच्याशी जरूर संपर्क साधा.
डॉ. महेश गायकवाड, निसर्ग जागर प्रतिष्ठान. 
मोबाइल : ९९२२४ १४८२२
वेबसाइट : http://www.nisargjagar.com/

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात.)

(‘अनवट वाटेवरचे वाटसरू’  हे सदर दर पंधरा दिवसांनी गुरुवारी प्रसिद्ध होते.)

(दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित झालेल्या डॉ. महेश गायकवाड यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZXTBF
 Thanks to Deshmukh madam for the article written on Dr. Mahesh Gaikwad really Mahesh was doing very good job on environmental studies & it's need of india become lots of mahesh gaikwad for bright future of india. Best of luck to Dr. Mahesh & once again thanks to Deshmukh mam.2
 मला त्यांचे बरोबर निसर्गात जायचा माझे भाचे Dr. सुजीत दाम्पत्याचे आग्रहखातर योग आला हे माझे नशीबच...
पुढचे वाटचालीस माझे परीवाराकडून शुभेच्छा1
Similar Posts
भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर...! पुण्यातला डॉ. अभिजित सोनवणे हा तरुण डॉक्टर म्हणजे अवलिया आहे. आठवड्यातले सहा दिवस तो विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांमध्ये जातो; पण त्याचा देव प्रार्थनास्थळात नसून, तिथे बाहेर बसलेल्या भिक्षेकऱ्यांमध्ये आहे. तो तिथे जातो, ते त्यांच्यावर मोफत उपचार करण्यासाठी. समाजानं टाकून दिलेल्या माणसांना आपलंसं करून
ब्रेल मॅन ऑफ इंडिया! आपल्या संवेदनशील मनाला सतत जागं ठेवून गेली अनेक वर्षं अंधांसाठी अफाट कार्य करणाऱ्या एका मराठी तरुणाला आज जगभरातले आणि देशातले अंध वाचक आणि डोळस वाचक ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखायला लागले आहेत. ही सगळी कामं हा तरुण कुठल्याही सरकारी मदतीशिवाय किंवा अनुदानाशिवाय स्वखर्चाने करत असतो. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज या अवलियाची ओळख
रुक जाना नहीं, तू कहीं हार के... बीए, एलएलबी झालेल्या, लग्न होऊन संसारात रुळलेल्या शारदा बापट नावाच्या एका स्त्रीनं आपल्या आईच्या सततच्या आजारपणाचं कारण शोधण्यासाठी चक्क वयाच्या पस्तिशीत डॉक्टर व्हायचं ठरवलं. रीतसर कॉलेज करून, असंख्य अडचणींना तोंड देत त्या डॉक्टर झाल्याही. त्याच दरम्यान त्या वैमानिकही झाल्या, कम्प्युटर्स-इलेक्ट्रॉनिक्स यांवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं
‘मनोहर’ कार्य करणारी ‘मुक्ता’ एखाद्याच्या दुःखानं अश्रूंना मुक्तपणे वाट करून देणाऱ्या, पण अन्यायाच्या विरोधातल्या मोर्चाचं नेतृत्व करताना कणखर, लढाऊ होणाऱ्या, कामगारांच्या हक्कांसाठी त्यांना लढण्याचं बळ देण्यासाठी प्रेरणादायी भाषणं करणाऱ्या आणि समाजाला जागृत करण्यासाठी या साऱ्यांचे प्रश्न प्रभावी लेखनातून मांडणाऱ्या संवेदनशील सामाजिक कार्यकर्त्या म्हणजे मुक्ता मनोहर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language